श्री विठ्ठलाचा पाळणा
श्रीविठ्ठलाचा पाळणा
पहिल्या दिवशी आनंद झाला | टाळ मृदंगाचा गजर केला ||
चंदन बुक्क्याचा सुवास त्याला | पंढरपुरात रहिवास केला |जो |
दुसऱ्या दिवशी करुनि आरती | दिंड्या पताका वैष्णव नाचती ||
वरती बैसविला लक्ष्मीचा पती || जो. ||
तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया | सुंदर किती हो बाळाची काया ||
आरती ओवाळू जय प्रभुराया || जो. ||
चवथ्या दिवशी चंद्राची छाया | पृथ्वी रक्षण तव कराया ||
चंद्रसूर्याची बाळावर माया || जो. ||
पाचव्या दिवशी पाचवा रंग | लावुनी मृदंग आणि सारंग ||
संत तुकाराम गाती अभंग || जो. ||
सहाव्या दिवशी सहावा विलास | बिलवर हंड्या महाली वास ||
संत नाचती गल्लोगल्लीत || जो. ||
सातव्या दिवशी सात बहिणी | एकमेकींचा हात धरोनि ||
विनंती करिती हात जोडोनि || जो. ||
आठव्या दिवशी आठवा रंग | गोप गौळणी झाल्या त्या दंग ||
वाजवी मुरली उडवितो रंग || जो. ||
नवव्या दिवशी घंटा वाजला | नवखंडातील लोकं भेटीला ||
युगे अठ्ठावीस उभा राहिला || जो. ||
दहाव्या दिवशी दहावीचा थाट | रंगीत फरश्या टाकिल्या दाट ||
महाद्वारातून काढली वाट || जो. ||
अकराव्या दिवशी आकार केला | सोन्याचा कळस शोभे शिखराला ||
रुख्मिणी बैसली डाव्या बाजूला || जो. ||
बाराव्या दिवशी बारावी केली | चंद्रभागेत शोभा ही आली ||
नामदेवाने धरली पायरी || जो. ||
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा